21 मार्च रोजी पाठवलेले चारही नमुने निगेटीव्ह
लातूर जिल्ह्यात संशयित करोना रुग्ण नाही
पालकमंत्र्यांची परिस्थितीवर बारीक नजर
लातूर येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेतील कोरोना संदर्भातील तयारीचा वैद्यकीय शिक्षण मंत्री व सांस्कृतिक कार्य मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख हे दैनंदिन आढावा घेत आहेत त्याचप्रमाणे जिल्ह्यातील यंत्रणा सतर्क ठेवण्याबाबत सातत्याने त्यांच्या संपर्कात आहेत.
21 मार्च रोजी विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्था रुग्णालयातून चार रुग्णांचे नमुने पुणे येथे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरोलॉजी रोजीकडे पाठविण्यात आले होते. काल रात्री उशिरा या नमुन्यांचे रिपोर्ट आले असून ते निगेटिव्ह आहेत. काल दिवसभरात जिल्ह्यात एकही संशयित रुग्ण आढळून न आल्याने कोणतेही नमुने तपासणीसाठी पुणे येथे पाठविण्यात आलेले नाहीत. लातूर येथून 11 ते 21 मार्च दरम्यान पुणे येथे पाठवले सर्व म्हणजेच 32 नमुने निगेटीव्ह आले आहेत असे असले तरीही लातूर येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत कोरोना रुग्णांसाठी 100 खाटांची स्वतंत्र व्यवस्था असणारा आयसोलेटेड वॉर्ड तयार ठेवण्यात आला आहे. करोना रुग्णां साठी 24 खाटांची आयसीयू यंत्रणाही उभारण्यात आली आहे. कोरोना तपासणीसाठी आवश्यक असणाऱ्या लॅबचे काम सुरू करण्यात आले आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर करोना तपासणीसाठी पुणे येथे नमुने पाठवावे लागणार नाहीत अशी माहितीही पालकमंत्री अमित देशमुख यांनी दिली आहे.